Inspired from the film ‘A Beautiful Mind’
मी डोळे उघडले. एका चौकोनी रुंद खोलीच्या कोपऱ्यात मी बसलो होतो. माझ्यासमोर एक बेड होता. त्याच्या एका बाजूला काही यंत्र होती आणि दुसऱ्या बाजूला एक फुलदाणी होती ज्यात काही फ्रेश लिली ठेवल्या होत्या. त्या खोलीत दरवळणाऱ्या एक विशिष्ट वासावरून मी अंदाज बांधला की मी हॉस्पिटल मध्ये होतो.
पण मी इथे आलो कसा? मी स्वतःहून आलोय का मला कोणी इथे आणलय? पण मला काही झालही नसताना मी इथे का आलोय?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत असताना समोरच्या बेडवर हालचाल झाली. मी जवळ जाऊन पाहिलं तर त्या बेडवर एक सुंदर तरुणी होती. चेहरा ओळखीचा वाटत होता. तिच्या एक हाताला अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या आणि दुसऱ्या हाताला सलाईन लावली होती.
“समीर.” तिने अस्फुट शब्दात हाक मारली.
“कल्पना, मी आहे इथे.” तिचं नाव लक्षात येताच मी तिचा हात धरला.
तिने हळुवारपणे डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहून हलकेच हसली.
“समीर, मला वाटलच होतं… जर मला काही झालं तर तू नक्की मला भेटायला येशील.”
“म्हणजे? कल्पना, तुला नक्की काय म्हणायचय?”
“माझ्या प्रेमाला जेव्हा तू प्रतिसाद दिला नाहीस त्याच दिवशी मी तुला शेवटचं भेटायचं ठरवलं. शेवटचं एकदा बाय म्हणायला… कोसळणारा पाऊससुद्धा अनरोमँटिक वाटत होता. मी स्कुटीवरून तुला भेटायला येत होते. तुझ्याचबद्दल विचार करत असताना समोरून ट्रक आला आणि…”
“आणि काय कल्पना?”
“आणि… पुढे सगळं धुरकट आहे.”
“डोन्ट वरी, मी आहे तुझ्या जवळ.”
////
काही दिवस गेले. कल्पनाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. घरी येण्याच्या काही दिवसातच ती कॉलेजला येऊ लागली. आम्ही कॉलेजच्या जवळच एक चौकात भेटायचो आणि मग कॉलेजला जायचो. तिच्यासोबत मला तेवढाच जास्त वेळ घालवता यायचा. कॉलेजमध्ये देखील आम्हाला एकमेकांशी बोलायला फार वेळ नसायचा. बहुतांश वेळा ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत व्यस्त असायची. आणि मी तिला पाहण्यात व्यस्त असायचो.
एकदा कल्पना तिच्या मैत्रिणीसोबत कॅन्टीनमध्ये येऊन बसली. मी सुद्धा त्यांच्या मागच्या टेबलावर बसलो. तिची मैत्रीण म्हणाली, “अगं तुला माहित्ये?! त्या समीर देशपांडेची एक गर्लफ्रेंड आहे-”
कल्पनाने तिच्या कुरळ्या केसांची बट कानामागे सरकवली आणि चोरट्या नजरेने मागे माझ्याकडे पाहिलं. माझ्याही चेहऱ्यावर स्मीत उमटलं.
“आणि तिचं नाव शर्वरी जाधव.” तिच्या मैत्रिणीने तिचं वाक्य पूर्ण केलं.
कल्पनाचं माझ्याकडे हसून चोरून पाहणं एकाएकी पुसलं गेलं. कल्पना तशीच उठली आणि तरातरा निघून गेली. जात जात माझ्याकडे एक कटाक्ष टाकला ज्यामुळे मलाही तिच्यामागे जाणं भाग पडलं. या गडबडीत माझ्या लक्षात नाही आलं की कल्पना माझ्याकडे चोरून पाहत असताना तिची मैत्रीणही माझ्या दिशेने पाहत होती पण एका शंकित नजरेने.
कॅन्टीनमधून बाहेर पडून ती अचानक गायबच झाली. कॉलेजनंतरही मला न भेटताच निघून गेली. तिला मी खूप फोन केले… मेसेज केले… पण काहीच फायदा झाला नाही.
खूप वेळाने फोन वाजला. कल्पना शास्त्री कॉलींग…
“हॅलो, कल्पना… अगं असं काहीच नाहीये! कोण ती शर्वरी जाधव माझी गर्लफ्रेंड वगैरे नाहीये!”
“मग कोण?” तिने थंडपणे विचारलं.
“तू” मी चटकन बोलून गेलो होतो. “नाही म्हणजे तसं मला म्हणायचं नव्हतं.” मी सारवासारव करण्याचे प्रयत्न करत असताना मला कल्पनाच्या गोड हसण्याचा आवाज आला.
“म्हणूनच आय लव्ह यू!!” कल्पना हसत म्हणाली.
कॉल एंडेड.
////
गाड्यांचे हॉर्न ऐकून मी डोळे उघडले. डोळे मिचमिचे करत मी अंदाज बांधायचा प्रयत्न केला. मी एका बस स्टॉपवर फॉर्मल्स घालून उभा होतो. तेवढ्यात कल्पनाचा फोन आला.
“हॅलो कल्पना, काय झालं?”
“काय झालं!! मी गेल्या पाऊण तासापासून इथे हॉटेलमध्ये तुझी वाट बघत बसल्ये आणि तू विचारतोयस काय झालं!! विसरला असशील तर आठवण करून देते की आपल्या ऍनिव्हर्सरीसाठी टेबल बुक केलय मी.”
“सो सॉरी कल्पना मला उशीर झाला. मी पोचतोच.”
आजूबाजूला पाहून, साधारण हॉटेलपासून आपण किती दूर आहोत याचा अंदाज बांधून मी धावत निघालो. दोघा – तिघांना आपटता आपटता वाचलो.
हॉटेलमध्ये शिरल्यावर कल्पना टेबलाजवळ उभी राहिली. आज ती फारच सुंदर दिसत होती. ब्लड रेड वन पीस, बेबी पिंक लिपस्टिक, मोकळे कुरळे केस आणि कानात लोंबरे झुमके… अशा या सौंदर्याला भेटायला मी ट्रोउजरमधून अर्धा बाहेर आलेला घामट्ट लीनेनचा शर्ट आणि मळलेल्या काळ्या बुटात भेटायला आलो होतो.
आम्ही समोरासमोर बसलो. गप्पा सुरु झाल्या. तिचा टेबलावरच्या हात मी माझ्या हातात घेणार तेवढ्यात वेटर आला.
“मॅडम, आला का तो?”
“हो, आता ऑर्डर घ्या.” असं म्हणून कल्पना ऑर्डर देऊ लागली आणि मी तिच्याकडे पाहत बसलेलो. माझ्या लक्षातच नाही आलं की त्या वेटर माझ्या दिशेने एका शंकित नजरेने बघत होता.
////
‘केनी जी’ चं ‘गोइंग होम’ हे गाणं ऐकून मी डोळे उघडले.
तो सॅक्सोफोन ऐकून फार शांत वाटत होतं. मी एका सिंगल बेडवर बसलो होत. माझ्या उजव्या बाजूला एक सरकणारी खिडकी होती जिला गुलाबी पडदे लावले होते. डाव्या बाजूला एक मोठा आरसा आणि कपाट होतं. समोर संगणकावर सॅक्सोफोन वाजत होता आणि त्याच्या बाजूला कल्पना उभी होती.
मी तिच्या जवळ गेलो. तिचे हात मी माझ्या हातात घेतले. कल्पना माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहत होती. या नजरेच्या खेळात तिच्या कुरळ्या केसांची बट अडथळा बनत होती. ती बट मी तिच्या कानामागे सरकवत असताना तिने तिचा गाल माझ्या हातावर टेकवला. मी हात काढून घेतला तरी ती तशीच उभी होती. मी हनुवटीने तिचा चेहरा माझ्याकडे वळवला. तिचे एकटक पाहणारे डोळे काहीतरी सांगत होते. मी तिच्या आणखी जवळ गेलो. तिचे निःशब्द उछ्वास मला जाणवत होते. मी तिच्या गालावरून हात फिरवला तर तिने चटकन लाजून मला मिठीच मारली. “आय लव्ह यू व्हेरी मच.” कानात कुजबुजणाऱ्या सुरात म्हणाली. तिने तिचं नाक माझ्या नाकावर टेकवल. तेवढ्यात खोलीचं दार उघडलं गेलं. साधारण चाळीशीतली एक बाई दारात उभी होती. कल्पना चटकन सावध होऊन मागे गेली.
“आई, तू इतक्या लवकर कशी आलीस?” कल्पना हलकी दचकली.
“कल्पना, तू काय करत्येस?” त्या बाईने विचारलं.
“अगं आई, तुला वाटतय तसं काही नाहीये… हा समीर मला फक्त एका प्रोजेक्टवर मदत करायला आलाय.”
कल्पनांच्या आईने माझ्या दिशेने पाहिलं. तिच्या डोळ्यात शंका आणि काळजी… दोन्ही दिसत होतं. ती खोलीत शिरली आणि कल्पनाचा हात धारून खेचत तिला खोलीच्या बाहेर नेलं. मीही त्यांच्या मागे जात होतो पण एका खोलीत गेल्यावर कल्पनाच्या आईने माझ्या तोंडावर दार बंद केलं. मी दाराला कान लावला; मला कल्पनाच्या रडण्याचा आवाज येत होता. मधेच तिच्या आईचा आवाज आला.
“हॅलो, डॉक्टर शेट्टी? मी मिसेस शास्त्री बोलत्ये… येस, कल्पनांची आई… डॉक्टर त्या शॉक थेरपीचा काही काळ फायदा झाला पण बहुतेक परत तेच सुरु झालय.”
“आई, मला काही झालेलं नाहीये!!” कल्पना रडत ओरडली.
“कल्पना, तू थांबशील का जरा? येस डॉक्टर ?! ओके… थँक यू… येस, बाय.”
मला काहीच काळात नव्हतं… शॉक थेरपी ?! कल्पनाचे आई-वडील तिला टॉरचर करत होते?!
“कल्पना, मी वाचवेन तुला.” मी दाराबाहेरून ओरडलो. कल्पना नुसती रडत होती.
“कल्पना, शांत हो.” कल्पनाच्या आईच्या आवाजात मला एकाएकी समजावण्याचा सूर जाणवला.
////
या घटनेनंतर कल्पना मला इग्नोर करू लागली. मला जाणवू लागला की ती मला बघूनसुद्धा मुद्दाम न बघितल्यासारखं करत्ये. तिला भेटून विचारायचं होतं की काय झालं पण संधीच मिळत नव्हती. एक दिवस ती संधी मिळाली. मी वर्गाबाहेर उभा होतो. कल्पना पहिल्या बाकावर एकटी बसलेली पाहून मी तिच्या बाजूला जाऊन बसलो.तिने माझ्याकडे पाहिलं आणि ती थंड नजर तशीच फळ्याकडे फिरवली.
“कल्पना, काय चाललय हे? काय करत्-” माझं वाक्य मॅडमच्या येण्याने अर्धवट राहिलं.
मॅडम म्हणाल्या, “तर आज, तुम्ही निवडलेल्या सायकोलॉजिकल विषयांवरचे तुमचे लेख सादर करायच्येत. मी ज्याचं नाव घेईन त्याने इथे फळ्याजवळ येऊन सगळ्यांसमोर तो लेख वाचायचा.” मॅडम नावं घेत होत्या. मुलं येऊन लेख वाचत होती. मी सारखं कल्पनाकडे पाहत होतो या अपेक्षेने की ही एकदातरी माझ्याकडे बघेल पण तिने एकदाही माझ्याकडे पाहिलं नाही.
“समीर देशपांडे!” मॅडम म्हणाल्या.
मी उभा राहिलो पण तेवढ्यात कल्पनाने माझा हात धरून मला थांबवलं. मी तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत असताना कोणीतरी समोर आलं आणि म्हणालं, “नमस्कार, मी समीर देशपांडे.”
मी फळ्याजवळ पाहिलं तर स्वतःलाच माझ्यापुढे पाहत होतो. मी जोरात ओरडलो, “काय अर्थ आहे याचा?! कोण आहे हा? मी आहे समीर देशपांडे!!” एवढं मी ओरडूनही कोणावरच काही फरक पडला नव्हता. तो फळ्याजवळचा समीर बोलू लागला.
“माझा विषय आहे कल्पना. कल्पना म्हणजे Imagination. Imagination हे एखाद्या व्यक्तीच्या आणि आठवणींचा गोफ म्हणता येऊ शकतं. या कल्पनेची निर्मिती आणि विनाश तिच्या विध्यात्यावर अवलंबून असते.”
माझ्या मनात चटकन विचार आला – हॉस्पिटल, ऍनिव्हर्सरीच्या रात्री आणि कल्पनाच्या खोलीत मी डोळे उघडले होते.
“या कल्पनेचं अस्तित्व तिच्या विधात्यापुरतच मर्यादित असतं.”
कल्पनांची मैत्रीण, तो वेटर आणि कल्पनांची आई – तिघांनीही माझ्या दिशेने शंकित नजरेने पाहिलं होतं.
“Sometimes the person becomes so influenced by his/her imagination that it starts feeling real to the person and he/she starts to hallucinate about it.”
मी धक्का पचवत बाकावर कोसळलो. काय बोलू काहीच सुचत नव्हतं. कल्पनाला काही विचारावं तर ती माझ्याकडे पाहत होती. चेहऱ्यावर हास्य पण डोळ्यात पाणी. ती म्हणाली, “बाय समीर, आय विल मिस यु.”
सगळी कोडी उलगडली.
कल्पना शास्त्रीच्या कल्पनाशक्तीचं मी एक उत्तम उदाहरण होतो. Yes, she was a schizophrenic.

Leave a comment