Ranked 4th in नि गो पंडितराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2013 – 2014
सुरुवात मी तुम्हाला एक कथा सांगून करतो. एक विशाल घर… त्यात एक वृद्ध व्यक्ती राहत असते. त्याला एक मुलगा व दोन नातू असतात. दोन्ही नातवंडांची लग्न झालेली आहेत. या दोन सुनांच्या सासू म्हणजे त्या मुलाची बायको अडॉल्फ हिटलरचा अवतार असते. धाकटी सून ही मोठ्या सुनेनी केलेली कारस्थानं आणि हिटलर सासूची बोलणी खात असते. त्या वृद्ध गृहस्थास अमरत्व लाभलेलं असून तो देवाकडे दीर्घायुष्याची याचना करत असतो. घरातील इतर पुरुष मंडळी ही सतत कसल्यातरी बिझनेसबाबत चर्चा करत असतात. आता हे सगळं माझ्या कल्पनेचे खेळ नसून टी.व्ही. वरील बहुतांश कौटुंबिक मालिकांचं मूळ कथानक आहे.
कौटुंबिक मालिका या गोष्टीमुळे अनेकांच्या घरातील चुली पटतात. बहुदा हिंदी व मराठी अशा दोन भाषेतील वाहिन्यांना संध्याकाळच्या सहाच्या ठोक्यानंतर लोकं चिकटलेली सापडतात. कधी कधी बायका इतक्या मग्न होतात की त्या अदृश्य भाज्या चिरताना देखील आढळतात.
कौटुंबिक मालिका म्हटलं की दोन प्रकार असतात. मालिकेत एकतर दोन कुटुंब असतात नाहीतर एक. दोन कुटुंब असतील तर दोन्ही श्रीमंत किंवा श्रीमंत – गरीब अशी आर्थिक परिस्थिती असते. ती काहीही असो… एका कुटुंबातील मुलगा आणि दुसऱ्या कुटुंबातील मुलगी यांचं प्रेमप्रकरण असलच पाहिजे. जर एकच कुटुंब असेल तर कुटुंब नियोजन या गोष्टीवर खूप मोठं प्रश्नचिन्ह पडतं. एक जोडपं… त्यांना पाच मुलं… त्यांच्यात प्रत्येकाला दोन दोन मुलं… आणि त्यातल्या तिघांची लग्नदेखील झालेली आहेत. हे सगळं मालिकेच्या पहिल्या दोन भागातच दाखवून मोकळे!!
भंपकपणा हा मालिकेंच्या मूळ पत्रात भिनलेला आहे; म्हणजे सासू – सून ही जोडी असलीच पाहिजे. मी असं म्हणत नाही की सगळ्याच मालिका तशा असतात. काही मालिका उत्कृष्टही असतात. पण विषय भंपकपणा असल्याने मी विषयांतर करत नाही. तर, जर मालिकेत ही जोडी असेल तर सासूला सुनेच्या मानगुटीवरील राक्षस म्हणून दाखवतात. त्यात ती सून म्हणजे सहनशक्ती आणि बिंडोकपणाचा कळस असते. ती सून इतकी बिंडोक दाखवली जाते की जर सासूने तिला विहीरीत जरी ढकललं तरी ही दुसऱ्या दिवशी सासूसाठी गरम गरम नाश्ता घेऊन उभी राहील.
मालिकेशी निगडित सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे टी.आर.पी. टी.आर.पी. चा अर्थ ‘टेलीव्हीजन रेटींग प्रोग्रॅम’ असा न घेता ‘ताई रडलीच पाहीजे’ असा घ्यावा. याचं कारण म्हणजे प्रत्येक मालिकेच्या प्रत्येक भागात कोणतरी रडताना आढळतच. जर कोणी रडत नसेल तर ‘आज सूर्य पश्चिमेला उगवला असावा’ असं म्हणावं.
असं म्हणतात की लेखक आपल्या आयुष्यातले व आसपासचे अनुभव आपल्या लेखनातून दाखवतो. याचा अर्थ असा घ्यावा का की त्याची आई उठसूट त्याच्या बायकोला मृत्युद्वारास पाठवत असते. विष देणं… विहीरीत ढकलणं… झोपेच्या गोळ्या देऊन कपाटात कोंडून जिवंत पुरणं… हे सगळं पाहून वाटतं की शरलॉक होम्सचा लेखक म्हणजे आर्थर कॉनन डॉयल हे खून करण्याचे कल्पक मार्ग पाहून लाजला असावा. समजा एखाद्या लेखकाच्या घराची आर्थिक परिस्थिती बिकट असेल तरी त्याच्या घरातील स्त्रिया या भरजरी साड्या आणि वेटलिफ्टरना न उचलता येण्या एवढ्या दागिन्यांमधे नटलेल्या असतात का?! बहुतेक या लेखकांना ‘पत्राला वयोमर्यादा असते’ हे माहीतच नसावं. उदाहरणार्थ – ‘चार दिवस सासूचे’ त्यातल्या सर्वात मोठ्या सासूला पणतू झाले तरी ही बाई ओलीम्पिकसच्या हेप्तथ्लॉनमध्ये सुवर्ण पदक पटकावले इतकी ठणठणीत असते. कदाचित अमजद खानने तिला विचारलं असतं – ये चार दिवस की सासू कौनसे चक्की का आटा खाती है? कधीकधी वाटतं की या लेखकांना स्रीजातीबाबतच तिरस्कार असावा. या जगात ९०% बायका या आनंदीबाई, मंथरा किंवा फीमेल व्हर्जन ऑफ शकुनी मामा असाव्यात असं या मालिकांमधून स्पष्ट होतं. खलनायिका तर कुटून भरून ठेवतात मालिकेत. नको त्या वेळी नको त्या जागी उपस्थित राहून हवतेच कसं काय ऐकतात या खलनायिका याची नवलच वाटते. आणि या खलनायिकेच्या करस्थानांमध्ये तिला बहुदा दोनच प्रकारचे व्यक्ती मदत करतात.
- कायम पिऊन टाईट असणारा दारुडा.
- थोडा वेडसर माणूस ज्याचं वेडेपणाचं सोंग उघडकीस पडल्यावर सगळे त्याला माफ करतात.
या मालिकांमधल्या पुरुष सदस्यांचा वर्षानुवर्षे मेहनत करून उभा केलेला टाटा बिर्लांना लाजवेल इतका मोठा बिझनेस एम्पायर असतो (किरणामालाचाही असू शकतो पण असतो) जो एका खलनायिकेमुळे एका भागात धाडकन कोसळतो. आठवड्याभरात पहावं तर तो एम्पायर परत उभाच न राहता त्याची भरभराटही झालेली असते. मालिकेचा नायक “ऑफिसला जातो गं” असं म्हणून नुसतं गेला तर ठीक आहे; पण जर गाडीत बसताना दाखवला तर अपघात अटळ आणि कोमात जायची गॅरेंटी. याचं कारण म्हणजे एकतर त्या नायकाचं निर्मात्यांशी काहीतरी वाजलं असावं किंवा त्याला दुसऱ्या मालिकेत वर्षानुवर्षे बेपत्ता असलेला नायिकेचा नवरा म्हणून एन्ट्री घ्यायची असेल.
या मालिकांचा लोकांवर प्रचंड परिणाम होतो. परवा ब्रेड आणायला गेलो होतो. त्या दुकानाजवळच्या नळापाशी दोन बायका पाणी भरताना बोलत उभ्या होत्या. त्यांच्या संवादावरून मला कळलं की एकीचं नाव सावित्री आणि दुसरी चंपा असावी. सावित्रीने आपलं भांडं पाणी भरत ठेवलं.
सावित्री
काय गो चंपे!! पाहिलास ना कालचा ‘रुंजी’ मधला प्रकार!!
चंपा
नाही हो सावित्रीबाई; पण ‘होणार सून’ पाहताय ना सध्या?!
सावित्री
आईआजी किती सांभाळून घेते जान्हवीला!! नाहीतर आमच्या सासूबाई पहा!!
चंपा
ती मेली जान्हवीची आई कधी सुधारणार काय माहित?! मी तर म्हणते घटस्फोट घेऊन टाकला पाहिजे अशा बाईशी!!
हा सगळा संवाद मी ऐकत असताना माझी नजर त्या नळाकडे गेली. तर त्या नळाखालच्या भांड्याकडे गेली तर त्या भांड्यातून नायगरा फॉल्स तयार होऊन वाहणाऱ्या पाण्याने ऍमझॉन नदीचं रूप घेतलं होतं!!
आपण आता जरा तांत्रिक गोष्टींबाबत बोलूया…
- चित्रीकरण
इकडून तिकडून कॅमेरा फिरवून दाखवणार सून रडत्ये, सासूने अबोला धरलाय. एपिसोडच्या शेवटी खूप वेळ उरतोय म्हणून मग कोणाचीतरी एन्ट्री होते ज्याचा चेहरा एपिसोडच्या शेवटपर्यंत दिसत नाही. त्या नव्या व्यक्तीचा चेहरासोडून इतर सगळ्या पात्रांचे चेहरे दाखवतात.
- वेशभूषा
एका बाईला समोरून दाखवताना तिची गुलाबी साडी तिलाच मागून दाखवताना लाल कशी होते?! सगळे पात्र झोपून उठतानासुद्धा चुण्या नसलेल्या कपड्यांमध्ये कसे काय उठतात या कोड्याचं उत्तर मी आजतागायत शोधतोय.
- केशभूषा
माझं एक प्रामाणिक मत आहे की या सगळ्या मालिकांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या घरांमध्ये बाथरूम कमी आणि ब्युटी पार्लरच जास्त असावेत. कारण कधीही पहावं तेव्हा सगळ्या पात्रांचे केस अगदी सेट असतात… झोपून उठतानासुद्धा !!
एक पाहायला गेलं तर या मालिकांमुळे मुलांना चालीरीती शिकवाव्या लागत नाहीत. अशा बाबत मुलांनी प्रश्न विचारलंच तर ‘अमुक मालिका बघ’ असं ठामपणे सांगावं. बारसं, मुंज, साखरपुडा, लग्न, हनिमून, डोहाळजेवण, सगळे सण इथपासून अग्नी देणं इथपर्यंत सगळ्या चालीरीती रीतसर दाखवल्या जातात.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पाश्चात्य मालिकांचा आपल्या मालिकांवर प्रभाव पडत नाही. नाहीतर ‘बोल्ड अँड ब्युटीफूल’ सारखी गत व्हायची. एक मुलगी एका मुलाशी लग्न करते. घटस्फोटानंतर त्याच्या मोठ्या भावाशी लग्न करते. मग कळतं की ती गरोदर आहे म्हणून दोघं भावंडं तिला वाऱ्यावर सोडतात. आणि कहर म्हणजे अशा वेळी तिला मदत करण्यासाठी या भावंडांचे वडील तिच्याशी लग्न करतात!! हे सगळं पाहून वाटतं की या पाश्चात्य मालिकांचा आपल्या मालिकांवर प्रभाव पडू नये हीच या ‘सॅटेलाईट वहिनी’ (लेख लिहीण्यासाठी दोन दिवस मालिका काय पाहिल्या एवढा परिणाम झाला) तर, असं होऊ नये ही या ‘सॅटेलाईट वाहिन्यां’ चरणी प्रार्थना!!

Leave a comment