भरतीचा समुद्र पाहिलाय?
बेभान उधाणलेला
अनेकदा मी लोकांना
आपली समस्या
समुद्रापाशी
किंचाळताना पाहिलंय...
ओठ बंद, आवाज नाही
आत खोल धुमसत असलेली
डोळ्यातून येणारी किंचाळी
जी केवळ समुद्र ऐकू शकतो
आणि तुमच्यापासून दूर नेऊ शकतो
प्रत्येक परतणाऱ्या लाटेसोबत...
कोण कुठली लाट परक्या किनाऱ्यावरून
तुमच्या किंचाळीचं निरसन कराया
तुमच्या किनाऱ्याशी येते
पण ऐकेल कसं कोणी
अशा कित्येक किंचाळ्या समावून
परक्या किनारी नेऊन
येताना निरसन घेऊन
किती लाटा येत असतात एकाच किनारी
म्हणूनच कदाचित समुद्रकिनारी लाटांचा कोलाहल असला
तरी शांतता सापडते
त्या त्या व्यक्तीला त्याची त्याची
भरतीचा समुद्र पाहिलाय?
बेभान उधाणलेला…
Leave a comment